५१ वर्षाचा काळ काही मानवासाठी छोटा नाही. ५१ वर्षे म्हणजेच ६१२ महिने, २ हजार ६६१ आठवडे, १८ हजार ६२७ दिवस, २ कोटी ६८ लाख २२ हजार ८८० दिवस...! हा काळ जेव्हा तासांमध्ये, मिनिटांमध्ये व सेकंदांमध्ये परिवर्तित करू, तेव्हा मिळणारा आकडा मोठा मोठा होत जातो. तुम्ही म्हणाल, मी हा कसला हिशोब मांडतोय? हा हिशोब आहे जीवनाचा, हा हिशोब आहे जीवनात आलेल्या मोठया संकटाचा, हा हिशोब आहे जीवनातील मोठ्या संकटावर मात करण्यासाठी परमात्म्याने दिलेल्या सामर्थ्याचा! ह्या ५१ वर्षाच्या काळात सर्वात महत्वाची गोष्ट नियतीने शिकविली ती म्हणजे माणुसकी! म्हणूनच ८ जुलै १९७२ ह्या दिवसापासून खऱ्या अर्थाने माणुसकीची शिकवण मिळण्यास सुरुवात झाली; असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
८ जुलै १९७२ रोजी आम्हा आताच्या शिवनेरी व पूर्वीच्या शिंदेवाडीवासियांसाठी काळा दिवस! त्या स्मृती संपूर्ण हृदयात जाऊन घट्ट रोवून बसल्या आहेत. त्याचे दुःख आहेच; कारण ते संकट एव्हरेस्ट शिखरापेक्षा मोठे होते. तरीही ५१ वर्षांनी त्या स्मृतीकडे पाहताना आम्ही कसे घडत गेलो; तेही आजच्यासाठी खूपच महत्वाचे आहे. ८ जुलै १९७२ रोजी वार होता शनिवार... पहाटे आमची इमारत जमीनदोस्त झाली. आज त्या घटनेला ५१ वर्षे पूर्ण झाली आहेत. ( ७ जुलै २०२१ रोजी मी ह्या संदर्भात लेख माझी इमारत शिंदेवाडी-१' ह्या ब्लॉगवर लिहिला होता. ते सर्व लेख व प्रतिक्रिया वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा! https://mazishindewadi1.blogspot.com/ )
इमारत कोसळली तेव्हा आम्हाला आधार दिला तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या फुटपाथने, महानगरपालिकेच्या शाळेने, शेजारी असलेल्या गुरुद्वाराने! कित्येक दिवस उघडा-नागडा संसार अनुभवला आणि जेव्हा जेव्हा असे संसार नजरेस पडतात तेव्हा त्यांच्याबद्दल आपुलकी वाटते. त्यांच्यासाठी काहीतरी करावे... ही भावना निर्माण होते आणि आपसूकपणे मदत केली जाते.
महानगरपालिकेच्या शाळेने आधार दिला खरा; पण पोटाची भूक भागवली ती गुरुद्वाराने! शीख धर्माचे प्रार्थना स्थळ! तरीही त्यावेळेच्या गुरुद्वाराने आमची विशेष काळजी घेतली होती. दोन वेळचे जेवण देताना गुरुद्वाराने, आम्हाला नास्ता-जेवण देताना मुख्य रस्त्यावर असलेल्या हॉटेल शांती कॉपी हाऊसने तसेच घरगुती वस्तू देऊन अनेक सामाजिक संस्थांनी आम्हाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे माणुसकीची शिकवण दिली होती.
हीच माणुसकी कशी जपायची? ह्याचं तंत्र-मंत्र-सूत्र आम्हाला त्यावेळेस मिळाले. ते जीवनात आजही असल्याने जेव्हा जेव्हा समोरचा अडचणीत असतो, दुःखात असतो तेव्हा तेव्हा माझ्याकडून कळत नकळतपणे मदत केली जाते. पण त्याचा मला अहंकार नाही आणि भविष्यातही अहंकार येऊ नये; अशी माझी परमात्म्याच्या चरणी प्रार्थना असते. कारण ह्या माणुसकीचं बीज ५१ वर्षांपूर्वी पेरलं गेलं होतं. त्यातून जो वटवृक्ष रुजला-वाढला तो किती विस्तारला? हे मला ठरविता येणार नाही. पण शिंदेवाडी-१ वासियांसाठी माझ्यासारखाच अनुभव कमी जास्त प्रमाणात येऊ शकतो.
मी आजही दृढपणे म्हणू शकतो; माणुसकी कशी जपावी? का जपावी? ते मला शिंदेवाडीने त्यावेळेला शिकविले! परमात्म्याने काही कमी नाही केले. त्याने सर्व काही दिले. आमच्या इमारतीसमोर गोल्डमोहर मिललगत मारूतीचे जागृत मंदिर आहे. आम्ही सर्व रहिवाशी इमारतीमध्ये प्रवेश करताना प्रथम मारुतीला नमस्कार करायचो आणि आजही करतो. ही आमची श्रद्धा होती, आमचा विश्वास होता आणि मारुतीरायाचा आशीर्वाद होता; त्यामुळेच संकटाचा सामना करता आला आणि जात, धर्म व कशाचाही भेदभाव न करता माणुसकी धर्म आजपर्यंत जपता आला; हेच आमचा भाग्य!
ह्या माणुसकीने आम्ही संपन्न होत असताना आपण सर्वांनी एकदिलाने एकत्र आले पाहिजे. आमच्यात सुसंवाद झाला पाहिजे. स्वतःचा इगो, अहंकार, स्वार्थ, दुष्मनी, हेवेदावे बाजूला ठेवून त्या सर्व शक्तिमान हनुमानावर दृढ विश्वास ठेऊन प्रामाणिकपणे- संघटीतपणे पुढील कार्याला हाती घ्यायला पाहिजे. ते कार्य म्हणजे शिवनेरी इमारतीचा पुनर्विकास. आपल्या सर्वांचे तत्कालीन लाडके नगरसेवक स्वर्गीय मोहन नाईक आणि त्यांना खंभीरपणे साथ देणारे तात्कालीन आमदार कै. विलासराव सावंत यांच्यावर विश्वास ठेऊन त्यावेळी शिंदेवाडी-१' ह्या अखंड कुटुंबाने संघटितपणे निर्णय घेतले होते. त्यातून सर्वांचे भलेच झाले. पण संघटना म्हटल्यावर चार पाच व्यक्तींचा विरोध अपेक्षित असतो. तो अपेक्षित ठेऊनच आजच्या सर्व सभासदांनी एकमेकांशी सुसंवाद साधलाच पाहिजे,.त्यातूनच आपल्या इमारतीची पुनर्बांधणी लवकरात लवकर होईल. १९७२ च्या प्रसंगातून आपण हेच शिकायला पाहिजे.
आज शिवनेरी सह. गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी संघटित येऊन कार्य करीत असताना एक कुटुंब म्हणून आपण सर्वांनी त्यांना साथ दिली पाहिजे. त्यातूनच शिवनेरीचा जलदगतीने पुनर्विकास होऊ शकतो. आपल्या सर्वांना काळाप्रमाणे बदलता आले पाहिजे. संघटनात्मक पातळीवर असो की वैयक्तिक पातळीवर असो; ज्याचा वर्तमानकाळ यशदायी त्याचे भविष्य यशदायीच असते. काळाप्रमाणे न बदलल्यास येणारा काळ कुणालाच क्षमा करणार नाही. गेल्या ५१ वर्षाचा शिंदेवाडी ते शिवनेरी ह्या प्रवासाचा सर्वांना अनुभव आहे. अनेक कुटुंबात नवीन पिढी प्रमुख झाली आहे. ह्या सर्वांनी आता एकजूट दाखविलीच पाहिजे.
शिंदेवाडी-१ म्हणजेच आताच्या शिवनेरीवासियांच्या जीवनात प्रत्येक क्षणी सुख, शांती, समाधान. आनंद, सुयश, किर्ती यावी ही मारुतीरायाकडे आणि नवरात्रीमध्ये ज्या आदिमातेच्या उत्सव साजरा करतो त्या आदिमातेकडे मनापासून प्रार्थना! आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
-मोहन सावंत
No comments:
Post a Comment