प्रति,
श्री. मोहन सावंत
सहसंपादक - पाक्षिक स्टार
'माझे महाकुटुंब, माझी शिवनेरी आणि पन्नास वर्षे!'
जय महाराष्ट्र!
महोदय,
आपण आपल्या शिंदेवाडी इमारतीत राहणाऱ्या सर्व स्थानिक रहिवाशी यांचा वृतांत दिलात आणि अंगावर काटा उभा राहिला.
तसे बघितले तर मुंबईतील प्रत्येक चाळीतील जीवनशैली कामगार विभागात एकसारखी होती. माणसामाणसातील आपुलकी- जिव्हाळा आणि एकत्रित कुटुंब पद्धती होती. त्यामुळे प्रेम, आपलेपणा आणि माणुसकी जीवंत होती. त्याअनुषंगाने शिंदेवाडी इमारत हे एक गावच होते. शिंदेवाडी इमारतीत रहिवाशांची जीवनशैली आणि संस्कृती परंपरा भिन्न असली तरी रहिवाशांची मालवणी भाषा आणि मराठी भाषा वागण्या-बोलण्यातून जाणवत होती. आज आम्ही अभिमानाने सांगू शकतो की, आम्ही लहानपणी उपाशी राहिलो नाही. शेजारधर्म नावाची माणुसकी शिल्लक होती. आज आम्ही जे मोठे झालो आणि आमचे बालसंगोपन कोणी केले असेल तर सर्वश्री माझी मावशी, कांबळी परिवार, भोसले परिवार, बाबल्या मोरे परिवार, वारंग परिवार, बागराव परिवार, इंदू मोरे परिवार; यांचे मोठे योगदान आहे. कधीही कोणताही परिवार एकमेकांच्या विरोधात नसायचे. प्रत्येकाचा उत्तम समन्वय असायचा. घरात एखादा गोड जिन्नस अथवा मटण केले तर त्या पदार्थांची देवाणघेवाण होत असे. चारही माळ्यावर आनंदी आनंद होता. माणुसकी जीवंत होती. मोठ्या माणसांची भीती व्यक्त होत होती. राजाराम नाईक, मोहन नाईक, गुंडू परब, दाजी मोरजकर, सहदेव कासकर, बागवे मास्तर, बाळकृष्ण साळगावकर, श्रीधर मळगांवकर, तुकाराम भगत, रमेश शिरोडकर, मनोहर शिरोडकर, मधु धाऊसकर, तुकाराम मोरे, सुरेश मोरे, नाना नाईक, देविदास कदम, विलास बारटक्के असे एक आदर्श निर्माण करणारी भिस्त होती.
पण आज मी अभिमानाने सांगेन की, आज आपण सर्व रहिवाशी जीवंत आहोत ते आपले एक रहिवाशी श्री रमेश बागराव यांच्यामुळे! कारण त्या रात्री त्यांनी अग्नीशमनदल पाचारण केले नसते तर एक मोठी दुर्घटना घडली असती. त्यानंतर काँग्रेसचे स्थानिक आमदार विलास सावंत यांनी आपल्याला समोरच्या शाळेत आश्रय करून दिला आणि आमदारांसोबत मोहन नाईक यांचे शिवसेनेच्या समाजसेवी प्रयत्नाने राजकारणात एक आदर्श निर्माण केला व ते प्रथम निवडून आले. त्यातून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.
माझ्या वडिलांनाही साप्ताहिक युगांतर आणि साप्ताहिक blitz या अंकातून शिंदेवाडी इमारत दुर्घटनाचे सविस्तर माहिती दिली होती.
आज शिंदेवाडी इमारतीचे पुनर्वसन होवून नवीन शिवनेरी इमारत उभी राहिली. शिवनेरी इमारतीचे भूमिपूजन शंकरराव चव्हाण यांनी केले आणि नवीन इमारतीचे नामकरण करण्यासाठी बरीच तारांबळ उडाली होती. शिवकृपा आणि नवनिर्माण अशा नावावरून वादंग निर्माण झाला होता; परंतु गृहनिर्माण मंत्री प्रभाकर कुंटेनी `शिवनेरी' हे नामकरण करून सर्वमान्य मार्ग काढून होणारा वाद संपुष्टात आणला.
त्यानंतर शिवनेरी इमारतीत प्रकर्षाने मोहन नाईक शिवसेनेचे दुसर्या वेळेला नगरसेवक म्हणून निवडून येवून संपूर्णपणे त्यांच्या अधिपत्याखाली सर्व संस्था, मंडळं एकरूप झाल्या आणि नवीन विचारांचा व विकासाचा पाळणा हलू लागला.
सर्व काही ठीक चालले होते आणि अचानक आपले मोहनराव स्वर्गवासी झाले आणि आपल्या इमारतीचा समाजसेवेचा अंत झाला. फार वाईट घटना घडली होती.
आज आम्ही मागे पाहतो तर एक खंत नेहमी प्रमाणे प्रकर्षाने जाणवते की, आज वारंगांची विठ्ठल रखुुमाईची दिंडी बंद झाली. तुकाराम मोरेचं ग्रंथ वाचन बंद झाले, भजन मंडळ बंद झाले, गाव गजाली आणि चाकरमानी येणे बंद झाले.
आज पन्नास वर्षे पूर्ण केली आहेत; पण जुनी शिंदेवाडी ते नवीन शिवनेरी असा प्रवास आपण आपल्या पिढीने बघितला.
परंतु ज्या गोष्टी आपण अधोरेखित करून नवीन पिढीच्या लक्षात उद्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्याचे सूतोवाच केलेत; त्याबद्दल आपले आभार आणि धन्यवाद.
अजून बर्याच आठवणी आहेत; पण वेळेअभावी लिहू शकत नाही. कारण ४० आमदारांनी गद्दारी केली म्हणून मन अवघड झाले आहे. लेखणी चालत नाही. असो! भेटू नंतर आणि बोलू पण!
आपले पुनश्च आभार!
आपला नम्र- अजय (आबा) मयेकर
No comments:
Post a Comment