८ जुलै १९७२!
आज बरोबर पन्नास वर्षे झाली. तरीही त्यादिवशी घडलेला प्रसंग आजही शरीराचा - मनाचा थरकाप उडवितो. वर्णन करायला शब्दच अपुरे पडतात. दुःख, वेदना, भय, चिंता आणि काळजी ह्या पाच जणांनी एकाच वेळी प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. शिंदेवाडी -१ ही इमारत कोसळली आणि आम्ही अक्षरशः रस्त्यावर आलो. शिंदेवाडी -१ इमारत म्हणजे २५० कुटुंबियांचे एक महाकुटुंब! ह्या दुर्घटनेत कोणाचेही प्राण गेले नाहीत; कारण आमच्या इमारतीसमोर नेहमीच आमचं रक्षण करणारा महाप्राण हनुमंत आमच्याकडे बघत होता. भवानी मातेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता. ह्या ५० वर्षात अनेक वयोवृद्ध मंडळी आमच्यातून निघून गेली; पण माझ्या समवयस्क मंडळींच्या मनात त्या आठवणी अजूनही घट्ट रोवून आहेत!
एखाद्या घटनेला पन्नास वर्षे झाली की सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो. विशेषतः चांगल्या गोष्टी घडल्या असल्यास किंवा केल्या असल्यास ही गोल्डन जुबली साजरी केली जाते; पण दुःखाची, भयाची, वेदनेची, चिंतेची, काळजीची गोल्डन जुबली साजरी करता येणार नाही. हे एका बाजूला खरं असलं तरी दुसऱ्या बाजूला त्या भीषण प्रसंगातून सावरण्यासाठी आम्हा महाकुटुंबाला महाप्राण हनुमंताने आणि भवानी मातेने दिलेले सामर्थ्य आणि त्या सामर्थ्याच्या जोरावर पन्नास वर्षात केलेला प्रवास मात्र आनंददायी - सुंदर असा आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही' तसंच संकटांचा सामना केल्याशिवाय मनुष्याची प्रगती होत नाही. आज त्या अर्थानेच `गोल्डन जुबली' आमच्या आयुष्यात आली; हीच त्या 'परमात्म्याची कृपा' असं मी तरी मानतो!
पन्नास वर्षांपूर्वी आपली इमारत कोसळत असताना आम्हा कुटुंबियांनी पाहिले. आमच्यासमोर आमचा संसार मातीमोल झाला होता, जीवनातील स्वप्नं भंग पावली होती. अचानक भविष्य अंधारमय झालं होतं. आम्हा बहुतांशी कुटुंबातील कर्ता कमावता पुरुष गिरणी कामगार होता. तेव्हा आमचे शिक्षण सुरु होते. माझ्या आईवडिलांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. त्यांना कुठल्या शब्दात समजावयाचे ते कळत नव्हते. जे आमचा आधार होते त्या आईवडिलांचे दुःख मला न पेलणारे होते. मलाही मोठा मानसिक धक्का बसला होता. मी माझा, माझ्या कुटुंबियांचा आणि `शिंदेवाडी -१' ह्या महाकुटुंबाचा विचार करू लागलो. यापुढे घरदार नसलेल्या मुलांचं शिक्षण कसं होणार? ती कुठे राहाणार? ते राहण्याचा पत्ता काय सांगणार? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्या क्षणाला देवावरील विश्वास उडाला. कारण परिस्थितीच एवढी बिकट होती की, ती सावरेल की नाही? ह्याची शाश्वती वाटत नव्हती. कमी अधिक प्रमाणात हीच मानसिकता प्रत्येकाची झाली असावी. अशा प्रतिकूल परिस्थितीत पुन्हा रस्त्यावरील फुटपाथ आमच्यासाठी आधार होता. त्या आधाराने आणि भवानी मातेच्या आणि हनुमंताच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा अनंत अडचणींवर मात करण्यास आम्ही सर्व सज्ज झालो. ह्या अविस्मरणीय आठवणींवर अनेकांचे अभिप्राय आले ते बोलके आहेत.
पन्नास वर्षांपूर्वी माझे हे महाकुटुंब शिंदेवाडी -१ म्हणून ओळखले जायचे आणि हेच महाकुटुंब शिवनेरी नावाने आज ओळखले जाते. नावात बदल झाला तरीही एकमेकांविषयी असणारी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा मात्र कमी झाला नाही. एकत्र कुटुंब म्हटले की भांड्याला भांडं आपटणारच; पण त्याचा विस्फोट होऊन कायमचा दुरावा निर्माण होत नाही! कारण आपुलकी, प्रेम, जिव्हाळा नेहमीच आम्हाला एकत्र बांधून ठेवतात! असे हे माझे महाकुटुंब अर्थात शिवनेरी एकमेकांबद्दलच्या असलेल्या आपुलकीच्या, प्रेमाच्या, जिव्हाळ्याच्या भक्कम पायावर उभी आहे! आम्हा सर्वांना हे गौरवास्पद आहे!
शिवनेरी म्हटलं की, नवरात्रीतील भवानी मातेचा नवरात्रौत्सव आणि राज्यपातळीवरील सुप्रसिद्ध कबड्डी स्पर्धा ह्या दोन दरवर्षीच्या अनुक्रमे आध्यात्मिक आणि क्रीडा महोत्सवांचा उल्लेख करावाच लागतो. एका बाजूला माहेरवासिनी आपल्या भवानी मातेच्या दर्शनासाठी येतात तर दुसऱ्या बाजूला कबड्डीचे दिग्गज खेळाडूं, तज्ञ, प्रेक्षक शिवनेरी सेवा मंडळ आयोजित कबड्डी स्पर्धेत सहभागी होतात. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय सुप्रसिद्ध असणारी आणि महाराष्ट्रात कबड्डीच्या स्पर्धांना शुभारंभ करणाऱ्या कबड्डी स्पर्धा होत असतात. हे विशेषत्व जपण्यासाठी शिवनेरीतील सर्व कुटुंबिय आपले योगदान देत असतात. त्यांना माझा सलाम!
गेल्यावर्षी ह्या घटनेला ४९ वर्षे झाली म्हणून माझी शिंदेवाडी -१ ह्या ब्लॉगवर मी माझे मनोगत व्यक्त केले आणि आपण दिलेल्या भरभरून प्रतिक्रिया आजही ब्लॉगवर वाचाव्यास मिळतात. शिवनेरीतीलच कुटुंबियांनी आपले मनोगत व्यक्त केले नाही तर शेजारी इमारतीमधील तसेच काही नातेवाईकांनी, मित्रमंडळींनीही मनाला भावणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या. हे विशेष!
पन्नास वर्षे झाल्यानंतर पुढे काय? हा प्रश्न उभा राहतो. शिवनेरी ह्या महाकुटुंबातील सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने वागावे आणि शिवनेरीच्या पुनर्विकासाचा खूप मोठा प्रश्न हाती घ्यावा; असं माझं म्हणणं आहे. कारण सावध तो सुखी असतो व आपण सर्वांनी सावध राहिले पाहिजे. शिवनेरी इमारत पुन्हा एकदा नव्याने उभी राहिलेली मलाच नव्हेतर सर्वांना पाहायची आहे. आमच्या पुढच्या पिढीला पन्नास वर्षांनी आनंददायी अनुभव एकमेकांना शेअर करता येईल.
गेल्या पन्नास वर्षात स्वर्गवासी झालेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, ही महाप्राण हनुमंत आणि भवानी माते चरणी प्रार्थना! आजच्या दिवसाच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या तसेच पुढील वाटचालीसाठी आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाच्या आहेत. माझ्याकडून काही चूक झाल्यास क्षमस्व!
`शिंदेवाडी-१' कोसळल्यानंतर आपण सायनला गेलो. तिथे चार वर्षे काढली. त्यानंतर शिवनेरी उभी राहिली. हा प्रवास यथावकाश शिवनेरीवासियांच्या सहकार्याने मी मांडण्याचा प्रयास भविष्यात नक्कीच करणार आहे.
आजच्या दिवशी माझ्या शिवनेरी या महाकुटुंबाला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! महाकुटुंबातील प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येक क्षणी आनंद, सुख, समाधान, सुयश, कीर्ती आणि सुदृढ आरोग्यासह दिर्घायुष्य लाभो हीच परमात्मा महाप्राण हनुमंत आणि भवानी मातेच्या चरणी प्रार्थना!
-मोहन सावंत ( सहसंपादक- पाक्षिक स्टार)
https://starvrutta.com
No comments:
Post a Comment