Sunday, July 10, 2022

एक साठवण - शिंदेवाडी ते शिवनेरी व्हाया ट्रान्झीट कॅम्प- भाग १ व २

 एक साठवण - शिंदेवाडी ते शिवनेरी व्हाया ट्रान्झीट कॅम्प- भाग १ 

शिंदेवाडी... 

मी आठ वर्षाचा होतो. त्यामुळे मला जुन्या शिंदेवाडीचे दिवस अंधुक आठवतात. तळाला चाळीचा गोल कमानीचा बोगदा आठवतोय. बोगद्याजवळ मोडक्या स्टुलासकट न्हावी आठवतो.

चाळीत माळ्यावरच्या गॅलरीच्या शेड्यावर उभ्या शिगांची खिडकी आठवतेय. 

आमच्या शेजारी चिंदरकर, राणे, तनपुरे, शिर्सेकर, लोकरे, नागलेकाका, मसुरकर, विचारे आजोबा, रेल्वेत काम करणारे शर्मा, मालुसरे रहात. सारेजण एकत्र कुटुंबासारखी होती. 

जुन्या शिंदेवाडीच्या आठवणींना उजाळा यावा म्हणून खूप वर्षापुर्वी मी कलेश्वर सोसायटी मुलुंडला मालुसरे आजीना, आशाताई मालुसरे यांना भेटायला गेलो होतो. पण मालुसरे आजी दुबईला मुलाकडे ( नाव कुमार असावं) गेल्या होत्या.

ब्लॅकआऊटच्यावेळी घरात लाईट चालू होती म्हणून मैदानातून कोणीतरी माझ्या आजोबांचा उद्धार (वो कलिंगड) केलेला आठवतो.

भल्या सकाळी आपल्या चाळीच्या चार माळ्याच्या चार खोल्या कोसळल्या. त्यात आमचीही एक खोली कोसळली. खोलीतले आमचे साळगांवकरांचे स्टीलमन कपाट लिफ्टसारखे खाली धसरत आले. १८ गेजच्या त्या कपाटाला फक्त पाठीमागेच चेपले होते. चार माळ्यावरुन घसरले पण व्यवस्थित होते पाहुन स्टीलमनच्या साळगांवकरांनी फुकटात रिपेअर करुन दिले.

ट्रांझिस्ट कॅम्प

सायनच्या खाडीतून  भांड्यांसाठी काळा साबण काढुन आणणारे आमचे हात आणि गटारात हात घालून बॅाल, विटी काढणारे ते खरुजलेले दिवस आठवतात.

त्या  खरुज, खांडकांनी भरलेल्या हातांना औषध लावण्यासाठी ज्यांच्याकडे जात असू ते प्रेमळ डॉक्टर तांडेल ( श्री. विष्णु तांडेल यांचे भाऊ) आठवतात. 

इंग्रजीचं (तडखरकर व्याकरणमाला) महत्व समजून उमजून ते मेहनतीने संध्याकाळी आम्हाला शिकवणारे आणि कधी कधी कान ओढणारे कडक शिस्तीचे सुरेश मोरे आठवतात.

मातीतल्या खेळातून शारिरीक जडण घडण विकसीत होण्यासाठी विकास क्रीडा मंडळाच्या माध्यमातुन संध्याकाळी अगदी आवडीने शाखा चालवणारे श्री. बाबल साळगांवकर, श्रीधर मळगांवकर आठवतात.

लंगडी, कबड्डी, साखळी साखळी सारखे मातीतले खेळ खेळून दमछाक झाल्यावर मालाडचा म्हातारा शेकोटीला आला. हे एका सुरात टाळ्यांच्या गजरात गाणे म्हणणारे ते सुरमयी संध्याकाळचे जगणे होते.

ट्रांझिस्ट कॅम्पमध्ये राहत असूनही नवरात्रीचे भारावलेले ते दिवस. सोनावालाच्या छप्पर टाकलेल्या खळ्यात देवीची मुर्ती घडण्यापासून ती मंडपात स्थान्नापन्न होईपर्यंत भाविक ट्रांझिस्ट कॅम्पातून दादरला येत; असं मी ऐकलं होतं.

डॅाक्टर म्हटला की तो गंभीर चेहऱ्याचा, मोजकं बोलणारा... आ करा जीभ बाहेर काढा, श्वास घ्या श्वास सोडा. असे नेमकी वाक्य बोलणारा. पण डॅाक्टर माला वेगळी ...हटके. चुकून डॅाक्टर झाली असं वाटायचं, खरं तर ती हिरोईन व्हायला हवी होती. दिसायला खूपच सुंदर. सिनेमाच्या नट्या फिक्या पडतील अशी उंच आंबाड्याची डॉक्टर माला नजरेत आजही डोलू लागते. कारण नसताना खोटा आजार अंगावर घेत डॅाक्टर मालाच्या दवाखान्यात बायको सोबत शिरणारे नवरे “सुख म्हणजे नक्की काय असतं “ ते नवऱ्याच्या चेहऱ्यावर दिसू लागे! 

“डॅाक्टर माला दवाखाना'' डॅाक्टरच्या नावाचा बस स्टॅाप असणारा हा मुंबईतला एकमेव बसस्टॅाप.

बनियान, चटेरीपटेरी चड्डी घालून पायावर पाय टाकून बसलेले मानसिंग राणे आणि त्यांचं टिपॅायवरचे दुकान आठवते. 

तायशेट्ये काकांच्या घरात बनणारी शेव गाठीयाच्या घमघमीत वासाने भुक चाळवायची.

सुंदर विहारचा उसळपाव आठवतो. उसळपावावरुन आठवलं रवी महाडीकच्या वडिलांना रेसकोर्समध्ये जॅकपॅाट लागला होता. त्या निमिताने त्यांनी एक सिनेमा रस्त्यावर दाखवला. हिवाळेकरांच्या दरवाजात मोठाला पडदा बांधून सिनेमा पाहीला. मजा आली. दुसऱ्या दिवशी रवीने आम्हाला सुंदर विहारला उसळपावची पार्टी दिली होती. संध्याकाळी बाबल साळगांवकर काका शाखा चालवायचे तिथे आमचे सिनियर म्हणायचे, ``रवीच्या वडिलांना घोडा लागला म्हणून सिनेमा आणि पार्टी दिली.

ट्रान्झीट कॅम्पचा विषय आला की तनु आणि खरबी ह्यांनी केलेल्या शिक्षाही आठवतात.... 

-------------------------------

एक साठवण - शिंदेवाडी ते शिवनेरी न्हाया ट्रान्झीट कॅम्प - भाग २

शिवनेरी

भल्या पहाटे उठून गेस्ट हाऊसकडे लाईन लावून वसंतशेटकडून गुलाबं घेण्याचा आनंद काही औरच होता.

एक पाय घासत चालणारी खाष्ट वाटणारी, पानाने तोबरा भरुन सतत बडबड करणारी, लादी भांडी धुणारी, मेहनती पण आईच्या मायेची अशी नववारीतली क्रिस्ना मावशीची आठवण येते.

दहशतीचे चेहरा काय असतो ते क्रिस्ना मावशींचा मुलगा पोलिसांच्या गोळीने लंगडा झालेला लंगडा पांड्या आठवतो.

एक खांदा खाली करुन बाबल्या बाबल्या है म्हणत चालणारा हाफ पॅंटवाला बाबल्या आठवतो.

उंच शिडशिडीत कान्या शरद भाय आठवतो.

ना उंची - ना शरीरयष्टी पण आवाजात रामपुरीची धार असलेला लक्षाभाय आठवतो.

रावळगांव, शेंगदाणे खायचे ते दिवस.

शुक्रवार आला की संतोषीमातेचा प्रसाद म्हणून साईनाथ जगदाळेकडचे ते बर्फीले दिवस आठवतात.

सणासुदीला एल्ली लाजो पल्ली लाजो पानसुपारी पन्नाविडा लावजो रे मारवाडा म्हणत माळा दणकावून सोडायचे ते महीला वर्गाचे ते दिवस आठवतात.

उद्या भंगीवाड्यावर अटॅक करायचाय म्हटल्यावर स्वयंघोषित भायलोक दगडी, बाटल्या ट्युब, बल्ब गोणत्यात गोळा करुन दुपारी दोन, तीन वाजू दे...   भंगीवाड्या बरोबर होणाऱ्या मारामाऱीते दिवस. शिवनेरी गच्ची गडावरुन खाली तुफानी दगडफेक करणारे ते दिवस. दगडी संपल्यावर लोकांच्या दरवाजावरचे बल्ब, टमरेलं, चपला काढून भंगीवाड्यावर फेकून मारणारा, सर्वांच्या मदतीला धावणारा पभ्या मसुरकर आठवतो.

ऐनाक बैनाकला पैसे देत नाही म्हणून त्या लोकांच्या दरवाजाला घुशी बांधणारा मस्तीखोर पभ्या मसुरकर आठवतो. 

कोल्हापुरी बाजीराव बनून धमाल उडवणारा बुवा बारटक्केची अदाकारी अन सोबतीला ‘सुंदरी’ बनलेला सुनील गरुडची नखरेल चाल आठवते.

बारसं असो, सत्यनारायणाची पुजा असो, रेकॅार्ड डान्सवर दिलखेच नृत्य करणारा सुनील गरुड आणि स्पेशल आयटम ‘केवा’ नजरेसमोरुन हटत नाही.

दता शिरोडकरचा एस पी बालसुब्रमण्यमच्या जवळ जाणारा मधुर दक्षिणी आवाज, त्याचवेळी सहदेव कासकर यांची भावगीतं, भक्तीगीत गायनाने सारेजण तल्लीन होऊन जात. 

मला पभ्या मसुरकर, पभ्याची बहीण पमा, राजु पार्टे, सरदारीनभाभी यांना रणजीत स्टुडीओत “हमारा संसार “ या हिंदी सिनेमात काम करायला घेऊन जाणारे अन्नुचे बाबा आठवतात. त्यांनी अण्णाच्या दुकानातून दिलेली चिमणी पाखरांची डीजाईन असलेल्या बिस्कीटांची चव आजही अन्नुच्या बाबांच्या प्रेमळपणाची साक्ष देत.

एरीयात कुठला सिनेमा आहे ती खबर देणारा खबरी हेमंत राऊळ आणि अर्ध्या चड्डीबॅाडीवर लाल मैदानापासून गणेश गल्लीपर्यंत आमचा म्होरक्या आबा मसेकर, नाना बिडये सोबत ८ ते १० जणांचं सिनेमा बघायला जाणं म्हणजे पिकनिकपेक्षा भारी होतं.

`कब क्यु और कहा' सिनेमा लाल मैदानात रात्री पाहून आल्यावर आपल्या बिल्डींगखाली मैताच्यावेळची फुलं, पानं, ओली चादर पडलेली पाहून एका मिनिटात पाचवा माळा गाठणारे आमच्या सारखे आम्हीच.

गॅलरीत झोपलेल्या चाळकेच्या चादरीला काळा धागा बांधून जिन्यावरुन त्यांच्या अंगावरची चादर सरकवणाऱ्या उंगल्या आठवतात.

भाऊ मोरे यांच्या घरी श्रावणात ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा व्हायचा. प्रत्येकाच्या घरुन चहाचा वाटप व्हायचं. ते श्रावणाचे दिवस म्हणजे पाचवा माळ्यावर भक्तीमय स्वरुप असायचे. सुनील कांबळीच्या खणखणीत आवाजातील ग्रंथवाचन आणि त्याचे निरुपण करणारे काका (त्यांत नाव लक्षात नाही) आठवतात. सुश्राव्य भजनाने ग्रंथ समाप्ती व्हायची.

खरंच ते बालपण, ते तारुण्य मातीशी घट्ट वीण बांधून होतं. हातापायांना मातीशी बांधीलकी होती म्हणून मातीला सुगंधी वास होता. भेटीगाठीत मित्रांचा सहवास होता. 

लागलं, खरचटलं तरी भुसभुशीत माती जखमेवर टाकून बिनदिक्कीत चालण्याचे ते दिवस होते.

दादरची शिंदवाडी, ट्रान्झीट कॅम्पची शिंदेवाडी, दादरची शिवनेरी या तीनही ठिकाणी आपल्या चाळीने नावलौकीक जपला. एक तरी मनुष्य भेटतोच भेटतो नी म्हणतो की अरे तु जुन्या शिंदेवाडीतला, अरे तू शिवनेरीत राहतो म्हणजे कबड्डी होतात तिथे. उर भरुन येतो. 

पावसाने आणि बाहेरगावी स्थलांतर केलेल्या चाळीतील कुटुंबांनी आजही चाळीशी जोडलेली नाळ तोडली नाही.

वर्षाला चार महिने पडणारा पाऊसही चाळीभोवती कंबरे इतकं पाणी तुंबवून चाळीला भेटून जातो. चाळीतून बाहेरगावी राहायला गेलेली कुटुंबेही एकदा तरी चाळीला काहीतरी निमित्त काढून भेटतातच. आता दिवस कसेतरी ढकलायचे म्हणत शरीराचं कॅांक्रीट झालं. शरीराला आजारांचे खड्डे जाणवू लागले. शहर बदललं, थोडी संस्कृतीही बदलली,  मातीनेही वास बदलला. हृदयमनाची भेट कानांनी काबीज केली. जगण्याच्या त्या हृदयआठवणी चार्जर लावून कान आठवणी ऐकू लागला.

शिंदेवाडी शिवनेरीच्या आठवणींच्या  झोपाळ्यावर अलगद बसताना प्रत्येक झोक्याला एक एक आठवणीने  मनाचे कवडसे उघडू लागतात.

-------------------

-स्वर्गीय राजेंद्र राऊत (बुधवळेकर) यांनी हे लेख लिहिले आहेत!

जुनी शिंदेवाडी ते नवीन शिवनेरी; आपुलकीचा प्रवास!



प्रति,

श्री. मोहन सावंत

सहसंपादक - पाक्षिक स्टार

'माझे महाकुटुंब, माझी शिवनेरी आणि पन्नास वर्षे!'

जय महाराष्ट्र!

महोदय,

आपण आपल्या शिंदेवाडी इमारतीत राहणाऱ्या सर्व स्थानिक रहिवाशी यांचा वृतांत दिलात आणि अंगावर काटा उभा राहिला.

तसे बघितले तर मुंबईतील प्रत्येक चाळीतील जीवनशैली कामगार विभागात एकसारखी होती. माणसामाणसातील आपुलकी- जिव्हाळा आणि एकत्रित कुटुंब पद्धती होती. त्यामुळे प्रेम, आपलेपणा आणि माणुसकी जीवंत होती. त्याअनुषंगाने शिंदेवाडी इमारत हे एक गावच होते. शिंदेवाडी इमारतीत रहिवाशांची जीवनशैली आणि संस्कृती परंपरा भिन्न असली तरी रहिवाशांची मालवणी भाषा आणि मराठी भाषा वागण्या-बोलण्यातून जाणवत होती. आज आम्ही अभिमानाने सांगू शकतो की, आम्ही लहानपणी उपाशी राहिलो नाही. शेजारधर्म नावाची माणुसकी शिल्लक होती. आज आम्ही जे मोठे झालो आणि आमचे बालसंगोपन कोणी केले असेल तर सर्वश्री माझी मावशी, कांबळी परिवार, भोसले परिवार, बाबल्या मोरे परिवार, वारंग परिवार, बागराव परिवार, इंदू मोरे परिवार; यांचे मोठे योगदान आहे. कधीही कोणताही परिवार एकमेकांच्या विरोधात नसायचे. प्रत्येकाचा उत्तम समन्वय असायचा. घरात एखादा गोड जिन्नस अथवा मटण केले तर त्या पदार्थांची देवाणघेवाण होत असे. चारही माळ्यावर आनंदी आनंद होता. माणुसकी जीवंत होती. मोठ्या माणसांची भीती व्यक्त होत होती. राजाराम नाईक, मोहन नाईक, गुंडू परब, दाजी मोरजकर, सहदेव कासकर, बागवे मास्तर, बाळकृष्ण साळगावकर, श्रीधर मळगांवकर, तुकाराम भगत, रमेश शिरोडकर, मनोहर शिरोडकर, मधु धाऊसकर, तुकाराम मोरे, सुरेश मोरे, नाना नाईक, देविदास कदम, विलास बारटक्के असे एक आदर्श निर्माण करणारी भिस्त होती.

पण आज मी अभिमानाने सांगेन की, आज आपण सर्व रहिवाशी जीवंत आहोत ते आपले एक रहिवाशी श्री रमेश बागराव यांच्यामुळे! कारण त्या रात्री त्यांनी अग्नीशमनदल पाचारण केले नसते तर एक मोठी दुर्घटना घडली असती. त्यानंतर काँग्रेसचे स्थानिक आमदार विलास सावंत यांनी आपल्याला समोरच्या शाळेत आश्रय करून दिला आणि आमदारांसोबत मोहन नाईक यांचे शिवसेनेच्या समाजसेवी प्रयत्नाने राजकारणात एक आदर्श निर्माण केला व ते प्रथम निवडून आले. त्यातून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.

माझ्या वडिलांनाही साप्ताहिक युगांतर आणि साप्ताहिक blitz या अंकातून शिंदेवाडी इमारत दुर्घटनाचे सविस्तर माहिती दिली होती.

आज शिंदेवाडी इमारतीचे पुनर्वसन होवून नवीन शिवनेरी इमारत उभी राहिली. शिवनेरी इमारतीचे भूमिपूजन शंकरराव चव्हाण यांनी केले आणि नवीन इमारतीचे नामकरण करण्यासाठी बरीच तारांबळ उडाली होती. शिवकृपा आणि नवनिर्माण अशा नावावरून वादंग निर्माण झाला होता; परंतु गृहनिर्माण मंत्री प्रभाकर कुंटेनी `शिवनेरी' हे नामकरण करून सर्वमान्य मार्ग काढून होणारा वाद संपुष्टात आणला.

त्यानंतर शिवनेरी इमारतीत प्रकर्षाने मोहन नाईक शिवसेनेचे दुसर्‍या वेळेला नगरसेवक म्हणून निवडून येवून संपूर्णपणे त्यांच्या अधिपत्याखाली सर्व संस्था, मंडळं एकरूप झाल्या आणि नवीन विचारांचा व विकासाचा पाळणा हलू लागला.

सर्व काही ठीक चालले होते आणि अचानक आपले मोहनराव स्वर्गवासी झाले आणि आपल्या इमारतीचा समाजसेवेचा अंत झाला. फार वाईट घटना घडली होती.

आज आम्ही मागे पाहतो तर एक खंत नेहमी प्रमाणे प्रकर्षाने जाणवते की, आज वारंगांची विठ्ठल रखुुमाईची दिंडी बंद झाली. तुकाराम मोरेचं ग्रंथ वाचन बंद झाले, भजन मंडळ बंद झाले, गाव गजाली आणि चाकरमानी येणे बंद झाले.

आज पन्नास वर्षे पूर्ण केली आहेत; पण जुनी शिंदेवाडी ते नवीन शिवनेरी असा प्रवास आपण आपल्या पिढीने बघितला.

परंतु ज्या गोष्टी आपण अधोरेखित करून नवीन पिढीच्या लक्षात उद्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्याचे सूतोवाच केलेत; त्याबद्दल आपले आभार आणि धन्यवाद.

अजून बर्‍याच आठवणी आहेत; पण वेळेअभावी लिहू शकत नाही. कारण ४० आमदारांनी गद्दारी केली म्हणून मन अवघड झाले आहे. लेखणी चालत नाही. असो! भेटू नंतर आणि बोलू पण!

आपले पुनश्च आभार!

आपला नम्र- अजय (आबा) मयेकर

Friday, July 8, 2022

माझे महाकुटुंब, माझी शिवनेरी आणि पन्नास वर्षे!



८ जुलै १९७२!

आज बरोबर पन्नास वर्षे झाली. तरीही त्यादिवशी घडलेला प्रसंग आजही शरीराचा - मनाचा थरकाप उडवितो. वर्णन करायला शब्दच अपुरे पडतात. दुःख, वेदना, भय, चिंता आणि काळजी ह्या पाच जणांनी एकाच वेळी प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. शिंदेवाडी -१ ही इमारत कोसळली आणि आम्ही अक्षरशः रस्त्यावर आलो. शिंदेवाडी -१ इमारत म्हणजे २५० कुटुंबियांचे एक महाकुटुंब! ह्या दुर्घटनेत कोणाचेही प्राण गेले नाहीत; कारण आमच्या इमारतीसमोर नेहमीच आमचं रक्षण करणारा महाप्राण हनुमंत आमच्याकडे बघत होता. भवानी मातेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता. ह्या ५० वर्षात अनेक वयोवृद्ध मंडळी आमच्यातून निघून गेली; पण माझ्या समवयस्क मंडळींच्या मनात त्या आठवणी अजूनही घट्ट रोवून आहेत!

एखाद्या घटनेला पन्नास वर्षे झाली की सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो. विशेषतः चांगल्या गोष्टी घडल्या असल्यास किंवा केल्या असल्यास ही गोल्डन जुबली साजरी केली जाते; पण दुःखाची, भयाची, वेदनेची, चिंतेची, काळजीची गोल्डन जुबली साजरी करता येणार नाही. हे एका बाजूला खरं असलं तरी दुसऱ्या बाजूला त्या भीषण प्रसंगातून सावरण्यासाठी आम्हा महाकुटुंबाला महाप्राण हनुमंताने आणि भवानी मातेने दिलेले सामर्थ्य आणि त्या सामर्थ्याच्या जोरावर पन्नास वर्षात केलेला प्रवास मात्र आनंददायी - सुंदर असा आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही' तसंच संकटांचा सामना केल्याशिवाय मनुष्याची प्रगती होत नाही. आज त्या अर्थानेच `गोल्डन जुबली' आमच्या आयुष्यात आली; हीच त्या 'परमात्म्याची कृपा' असं मी तरी मानतो!

पन्नास वर्षांपूर्वी आपली इमारत कोसळत असताना आम्हा कुटुंबियांनी पाहिले. आमच्यासमोर आमचा संसार मातीमोल झाला होता, जीवनातील स्वप्नं भंग पावली होती. अचानक भविष्य अंधारमय झालं होतं. आम्हा बहुतांशी कुटुंबातील कर्ता कमावता पुरुष गिरणी कामगार होता. तेव्हा आमचे शिक्षण सुरु होते. माझ्या आईवडिलांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. त्यांना कुठल्या शब्दात समजावयाचे ते कळत नव्हते. जे आमचा आधार होते त्या आईवडिलांचे दुःख मला न पेलणारे होते. मलाही मोठा मानसिक धक्का बसला होता. मी माझा, माझ्या कुटुंबियांचा आणि `शिंदेवाडी -१' ह्या महाकुटुंबाचा विचार करू लागलो. यापुढे घरदार नसलेल्या मुलांचं शिक्षण कसं होणार? ती कुठे राहाणार? ते राहण्याचा पत्ता काय सांगणार? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्या क्षणाला देवावरील विश्वास उडाला. कारण परिस्थितीच एवढी बिकट होती की, ती सावरेल की नाही? ह्याची शाश्वती वाटत नव्हती. कमी अधिक प्रमाणात हीच मानसिकता प्रत्येकाची झाली असावी. अशा प्रतिकूल परिस्थितीत पुन्हा रस्त्यावरील फुटपाथ आमच्यासाठी आधार होता. त्या आधाराने आणि भवानी मातेच्या आणि हनुमंताच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा अनंत अडचणींवर मात करण्यास आम्ही सर्व सज्ज झालो. ह्या अविस्मरणीय आठवणींवर अनेकांचे अभिप्राय आले ते बोलके आहेत. 

पन्नास वर्षांपूर्वी माझे हे महाकुटुंब शिंदेवाडी -१ म्हणून ओळखले जायचे आणि हेच महाकुटुंब शिवनेरी नावाने आज ओळखले जाते. नावात बदल झाला तरीही एकमेकांविषयी असणारी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा मात्र कमी झाला नाही. एकत्र कुटुंब म्हटले की भांड्याला भांडं आपटणारच; पण त्याचा विस्फोट होऊन कायमचा दुरावा निर्माण होत नाही! कारण आपुलकी, प्रेम, जिव्हाळा नेहमीच आम्हाला एकत्र बांधून ठेवतात! असे हे माझे महाकुटुंब अर्थात शिवनेरी एकमेकांबद्दलच्या असलेल्या आपुलकीच्या, प्रेमाच्या, जिव्हाळ्याच्या भक्कम पायावर उभी आहे! आम्हा सर्वांना हे गौरवास्पद आहे!

शिवनेरी म्हटलं की, नवरात्रीतील भवानी मातेचा नवरात्रौत्सव आणि राज्यपातळीवरील सुप्रसिद्ध कबड्डी स्पर्धा ह्या दोन दरवर्षीच्या अनुक्रमे आध्यात्मिक आणि क्रीडा महोत्सवांचा उल्लेख करावाच लागतो. एका बाजूला माहेरवासिनी आपल्या भवानी मातेच्या दर्शनासाठी येतात तर दुसऱ्या बाजूला कबड्डीचे दिग्गज खेळाडूं, तज्ञ, प्रेक्षक शिवनेरी सेवा मंडळ आयोजित कबड्डी स्पर्धेत सहभागी होतात. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय सुप्रसिद्ध असणारी आणि महाराष्ट्रात कबड्डीच्या स्पर्धांना शुभारंभ करणाऱ्या कबड्डी स्पर्धा होत असतात. हे विशेषत्व जपण्यासाठी शिवनेरीतील सर्व कुटुंबिय आपले योगदान देत असतात. त्यांना माझा सलाम!

गेल्यावर्षी ह्या घटनेला ४९ वर्षे झाली म्हणून माझी शिंदेवाडी -१ ह्या ब्लॉगवर मी माझे मनोगत व्यक्त केले आणि आपण दिलेल्या भरभरून प्रतिक्रिया आजही ब्लॉगवर वाचाव्यास मिळतात. शिवनेरीतीलच कुटुंबियांनी आपले मनोगत व्यक्त केले नाही तर शेजारी इमारतीमधील तसेच काही नातेवाईकांनी, मित्रमंडळींनीही मनाला भावणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या. हे विशेष! 

पन्नास वर्षे झाल्यानंतर पुढे काय? हा प्रश्न उभा राहतो. शिवनेरी ह्या महाकुटुंबातील सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने वागावे आणि शिवनेरीच्या पुनर्विकासाचा खूप मोठा प्रश्न हाती घ्यावा; असं माझं म्हणणं आहे. कारण सावध तो सुखी असतो व आपण सर्वांनी सावध राहिले पाहिजे. शिवनेरी इमारत पुन्हा एकदा नव्याने उभी राहिलेली मलाच नव्हेतर सर्वांना पाहायची आहे. आमच्या पुढच्या पिढीला पन्नास वर्षांनी आनंददायी अनुभव एकमेकांना शेअर करता येईल. 

गेल्या पन्नास वर्षात स्वर्गवासी झालेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, ही महाप्राण हनुमंत आणि भवानी माते चरणी प्रार्थना! आजच्या दिवसाच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या तसेच पुढील वाटचालीसाठी आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाच्या आहेत. माझ्याकडून काही चूक झाल्यास क्षमस्व! 

`शिंदेवाडी-१' कोसळल्यानंतर आपण सायनला गेलो. तिथे चार वर्षे काढली. त्यानंतर शिवनेरी उभी राहिली. हा प्रवास यथावकाश शिवनेरीवासियांच्या सहकार्याने मी मांडण्याचा प्रयास भविष्यात नक्कीच करणार आहे.

आजच्या दिवशी माझ्या शिवनेरी या महाकुटुंबाला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! महाकुटुंबातील प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येक क्षणी आनंद, सुख, समाधान,  सुयश, कीर्ती आणि सुदृढ आरोग्यासह दिर्घायुष्य लाभो हीच परमात्मा महाप्राण हनुमंत आणि भवानी मातेच्या चरणी प्रार्थना! 

-मोहन सावंत ( सहसंपादक- पाक्षिक स्टार) 

https://starvrutta.com

शिवनेरी सेवा मंडळलाचे क्रीडा प्रमुख लुमजी सुमंत धुरी उर्फ बाळ धुरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

लुमजी सुमंत धुरी उर्फ बाळ धुरी! क्रिडा क्षेत्रातील आदर्शवत व्यक्तिमत्व! त्यांनी व त्यांच्या सौभाग्यवती खोखो व अथ़ल्लेटिक्स-धावणे या भारतीय ख...