Wednesday, July 28, 2021

तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी आशीर्वाद...!

सुख दुःखाच्या जुन्या आठवणी मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात दडलेल्या असतात आणि त्या अचानक कागदावर उतरतात तेव्हा समजत नाही, ह्या एवढे दिवस कुठे लपून बसल्या होत्या? मला असं वाटतं की माणसाचे पाय नेहमीच जमिनीवर असले की; मागच्या गोष्टी आपोआप नेहमीच आठवत राहतात. विशेषतः सुखापेक्षा दुःखाचे दिवस अधिक चांगले स्मरणात राहतात. मात्र ते दुःखाचे दिवस आठवले की दुःख करीत न बसता, नियतीला दोष न देता त्या संकटकाळी आपल्याला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांची कृतज्ञता आपल्या कृतीतून प्रकट झाली पाहिजे. सर्व काही देणारा `तो' अर्थात परमात्मा सद्गुरु असला की, जीवनात कशाचीही कमतरता पडत नाही. माझी आई नेहमी म्हणायची, `माणसान दिलेला पुरना नाय आणि देवान दिलेला सरना नाय!' (कुठल्याही माणसाने दिलेले कधीच पुरेसे नसते आणि देवाने दिलेले कधीही संपत नाही.) ह्या संस्कारातूनच भूतकाळातील दुःखाच्या गोष्टींकडे मी सकारात्मक दृष्टीने पाहतो. म्हणूनच मी `माझी इमारत शिंदेवाडी-१' हा ब्लॉग लिहू शकलो. मात्र ब्लॉग लिहिल्यानंतर आपण सर्वांनी मला दिलेल्या प्रतिसादाने मी भारावून गेलो. 

तुम्हा मित्रांसोबत चर्चा करताना असो व जुन्या आठवणी आल्यावर असो; नेहमीच मला ८ जुलै १९७२ ही तारीख काही क्षणापुरते असेना का; माझ्या डोळ्यात अश्रू आणायची नव्हे आजही आणते. ते अश्रू दुःखाचे की सुखाचे हे समजत नाही; पण आईवडिल-भावंडांसह शिंदेवाडी १ इमारतीच्या सर्व कुटुंबियांच्या प्रेमाने ते अश्रू पन्नास वर्षानंतर आजही सहजपणे डोळ्यात जमा होतात आणि मन गलबलून जाते, श्वासाचा वेग वाढतो. पण प्रत्येकवेळी त्या आठवणींनी शरीरात नवीन ऊर्जा प्रकट होते. म्हणूनच शिंदेवाडी ते शिवनेरीचा प्रवास आजही प्रेरणादायी ठरतो. 

८ जुलै १९७२ ही तारीख माझ्यासह अनेक शेजाऱ्यांच्या आयुष्याला-जीवनाला कलाटणी देणारी होती. तो दिवस मला आठवला तसा शब्दांकीत केला आणि नंतर तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रतिक्रियांनी तर मला अनेक सुंदर कल्पना सुचल्या. ह्या ब्लॉगवरच मी त्या कल्पना यथावकाश मांडेन आणि त्यावर तुम्ही मला सूचना करायच्या आहेत, मार्गदर्शन करायचे आहे, आशीर्वाद द्यायचे आहेत! तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी आशीर्वादच असतात! म्हणून प्रतिक्रिया द्यायला विसरू नका! एवढेच नव्हे तर तुम्ही सर्वांनी जुन्या आठवणी शब्दांकीत करा किंवा त्याचा व्हिडीओ तयार करा! (काही अडचणी असल्यास नक्कीच माझ्याशी संपर्क करा!)

आपण मला व्हाट्सअँपच्या माध्यमातूनही प्रतिक्रिया दिल्यात! त्या सर्व प्रतिक्रिया मी खाली देत आहे; जेणेकरून सर्व प्रतिक्रिया ब्लॉगवर वाचता येतील.     

आपला सर्वांचा - मोहन सावंत


प्रतिक्रिया....  

जुनी शिंदेवाडी - सुंदर मोजक्या शब्दात प्रसंग उभे केले आहेत. वेबसिरीजप्रमाणे पहिला सिक्वेल शिंदेवाडी, दुसरा सायन व तिसरा शिवनेरी होऊ शकते. पुढील लेखाकरीता शुभेच्छा!

- सुहास शिरोडकर 

चांगली गोष्ट आहे मित्रा; असेच नवीन नवीन उपक्रम राबवा व उदयोन्मुख मंडळीस चिअर्सअप करा! त्यांचा उत्साह वाढवा! माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा! जय महाराष्ट्र!

-सुहास शिरोडकर 

----------------------------

आपले जुन्या  शिंदेवाडीचा लेख वाचला. मी शेजारी रंगारी चाळीत लहानाचा मोठा झालो, त्यामुळे मी शिंदेवाडीतील सगळे उतार-चढाव जवळून पाहिले आहेत. आपले सुख दुःख माहीत आहे. असो. आपले लिखाण आवडले. लिखाण चालू ठेवा!  

आपला मित्र- शरद कांदळकर

-----------------------------

मोहन, आपल्या भावना अगदी योग्य शब्दात व्यक्त केल्या आहेस! छान!!

-अशोक तांडेल 

-----------------------------

खूप छान! 

-संजय पाटकर 

-----------------------------

खूप छान!!

-जगदीश पेडणेकर 

-----------------------------

लेख वाचून जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. अप्रतिम !

-विजय वारंग 

-----------------------------

वरील लेखात माझी शिंदेवाडी १ कोसळतानाचे  हुबेहूब वर्णन करण्यात आले आहे. या वाईट अनुभवातून बोध घ्या. इमारतीचा लवकरात लवकर पुनर्विकास करा. 

-नरेश मोरे  

-----------------------------

मोहन सावंत यांनी शिंदेवाडी क्रमांक १ बाबत लिहिलेला लेख वाचताना जुन्या आठवणीने डोळ्यात पाणी आले! मोहन, खूप खूप धन्यवाद!

-विष्णू तांडेल 

-----------------------------

मोहन सावंत यांनी शिंदेवाडी क्रमांक १ चा इतिहास लिहून जुन्या स्म्रुती जागृत केल्याबाबत मोहन मनःपूर्वक धन्यवाद! 

-शिवाजी राणे 

-----------------------------

माझी आई सांगत असे आमच्या मजल्यावरील हिंदळेकर यांचे पोट खराब होते म्हणून मधेच बाथरूम मध्ये जाऊन येत. रात्री ३  वाजता बाथरूममध्ये जाऊन आल्यावर घरात पाय ठेवला आणि बाहेरचा भाग कोसळला, जिना कोसळला; उंबरयाचा पुढे दरी झाली. बाहेर येता येईना. घाबरले आणि खिडकीतून तिसऱ्या मजल्यावरून बायकोच्या साड्या बांधून उतरू लागले.

मग फायर ब्रिगेडवाल्यांनी सांगितले की घाबरु नका. कमकुवत भाग पडला आहे आता बिल्डिंग पडणार नाही. आम्ही त्यांना शिडी लाऊन उतरवले. 

-निलेश बागवे 

-----------------------------

मोहन सावंत यांनी शिंदेवाडी क्रमांक १ चा इतिहास लिहून जुन्या स्म्रुती जागृत केल्याबाबत मोहन मनःपूर्वक धन्यवाद! 

-बाबाजी धुरी 

-----------------------------

मोहन सावंत आपले मनःपूर्वक अभिनंदन! 

आपला एक लेख (लिखाण) माझी इमारत जुनी शिंदेवाडी क्रमांक १ जे तू सविस्तर वर्णन आपण केलेले आहे; त्याबद्दल आपण अभिनंदनास पात्र आहात. स्वतःचा स्वतःच्याच विचारावर, कृतीवर, क्षमतेवर आणि लेखणीवर विश्वास म्हणजे आत्मविश्वास; कोणत्याही करियर क्षेत्रात प्रगतीपथावर नेऊन ठेवतो. हे तू दाखवून दिलेले आहे.

मोहन तू आणि तुझे कुटुंब एक मध्यमवर्गीय कुटुंब! तुझे सुंदर व्यक्तिमत्त्व! दिसायला रुबाबदारपणा, हुशार, क्रीडा क्षेत्रात अग्रेसर! त्यामुळे शिवसेनेचे माजी नगरसेवक कै. मोहन राजाराम नाईक यांनी तुला त्यावेळी विकास क्रीडा मंडळात प्रमुख कार्यवाह होण्याची गळ घातली होती. माझ्यासह कै. बाळकृष्ण साळगावकर आणि कै. श्रीधर मळगावकर आम्ही सर्व त्याचे साक्षीदार होतो . असो! 

आज आनंद वाटतो की आजही तुझे मन आणि तुझ्या अंगातील चांगुलपणा आणि तळमळ तुला दादासाहेब फाळके रोडवर घेऊन येते आणि यापुढेही असेच विचार आणि लेखन करीतच राहो; अशी साद देवी भवानी करीत असेलच.

मोहन आज मला असे वाटते की, कुणापेक्षा मोठे व्हावे यासाठी नाही तर समाजासाठी काही करावे; या हेतूने कार्य करण्यासाठी तुझी लेखणी साकारु दे! ही सदिच्छा! 

-अजय (आबा) मयेकर

-----------------------------

आबा आपण आपले मनोगत फारच छान रितीने व्यक्त केले आहे. मोहन तसेच आपण मराठी भाषेत उत्तम रीतीने विचार मांडले आहेत. मला ग्रुपवर अशाच प्रकारे वैचारिक देवाणघेवाण व्हावी असे वाटते! छान! धन्यवाद! 

-अशोक तांडेल 

-----------------------------

आबा, मोहन सावंत यांनी लिहलेल्या लेखावर तू मोजक्या शब्दात अतिशय उत्तम परीक्षण केलेस; हे वाचून खूप आनंद झाला. युनियन कार्यकर्ता इतके चांगले लिहू शकतो हे विशेष! असेच लिहीत जा, तुला शुभेच्छा! 

-विष्णू तांडेल

-----------------------------

तुम्ही एक उत्तम लेखक आहात; हे आज समजले. मी परळ भागात रहात होते; पण हे सर्व माहित नव्हते. बापरे केवढ्या मोठ्या प्रसंगातून तुम्ही गेलात. मी माझ्या भावंडांना व ओळखीच्यांना वरील लेख पाठवित आहे. मला पाठविल्याबद्दल आभारी आहे.

-पारकर मॅडम 

-----------------------------
प्रतिक्रिया दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद!                                                     आपला सर्वांचा - मोहन सावंत


Monday, July 12, 2021

मनःपूर्वक धन्यवाद...

`माझी इमारत शिंदेवाडी-१' नावाचा ब्लॉग मी ८ जुलै रोजी प्रसिद्ध केला आणि आपण सर्वांनी तो वाचला आणि आपल्या प्रतिक्रिया कळविल्या! त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपण दिलेल्या प्रतिक्रियेवरून एक गोष्ट मला जाणवली की, माझ्याप्रमाणेच किंवा त्यापेक्षा अधिक शिंदेवाडी-१ ह्या इमारतीशी भावनिक नाते आपल्या सर्वांचे होते. सुख-दुःखात आपण सर्व एकत्र राहिलो. त्यानंतर सायनाला संक्रमण शिबिरात जावे लागले आणि नंतर आपण नवीन शिवनेरी इमारतीत राहायला आलो. हा प्रवासही अतिशय महत्वाचा आहे. ह्या संदर्भात अनेक जुन्या आठवणी मला आपण सर्वजण सांगत आहेत. ते लिखाण मी सवडीनुसार करीन; परंतु तुम्ही सर्वांनी त्या आठवणी लिहिल्या पाहिजेत, सांगितल्या पाहिजेत. अशी माझी विनंती आहे.

आपला सर्वांचा- मोहन सावंत 

(माझ्या ब्लॉगची लिंक देत आहे; त्यावर जाऊन तुम्ही मी लिहिलेला लेख आणि इतरांनी दिलेल्या प्रतिक्रिया  वाचू शकता!)  https://mazishindewadi1.blogspot.com/

धन्यवाद


Wednesday, July 7, 2021

४९ वर्षांपूर्वी... देव तारी त्याला कोण मारी?

shindewadi building


स्वतःचे राहते घर जेव्हा आपल्या डोळ्यासमोर जमीनदोस्त होऊन काही क्षणात संसाराचे होत्याचे नव्हते; तेव्हा त्या कुटुंबियांच्या भावना काय असतात? ह्याचा अनुभव आम्ही `शिंदेवाडी इमारत क्र. १' बिल्डिंगमधील सुमारे २५० कुटुंबियांनी पन्नास वर्षांपूर्वी घेतला. त्यावेळच्या भावना आजही मनाच्या एका कोपऱ्यात घट्टपणे रोवून बसल्या आहेत. त्या भावनांना शब्दांमध्ये रुपांतरीत करणे शक्य होईल असे वाटत नाही; कारण एकाच वेळेला मनात यंत्रणेबद्दल चीड होती, तर दुसरीकडे संसार उध्वस्त झाल्याने अतीव दुःख होते, घराच्या माता भगिनींचा आक्रोश होता, रडणे-किंचाळणे-आरडाओरड सुरु होती आणि उद्या काय? म्हणजेच भविष्य अंधारमय झाले होते. म्हणून त्या भावना मरण यातना देणाऱ्या शारीरिक मानसिक त्रास शब्दांच्या चौकडीत बसविणे शक्य वाटत नसताना कुठेतरी मनाच्या त्या तीव्र भावनांना मोकळीक करून देण्याचा मी प्रयास करतोय. 

शिंदेवाडी इमारत म्हणजे मिनी कोकण! बहुसंख्य रहिवासी हे कोकणातील, विशेषतः सिंधुदुर्गातील! प्रत्येक घरातील एक किंवा दोन व्यक्ती मिल कामगार! त्याचप्रमाणे त्याकाळी प्रत्येक कुटुंबात चारचार पाचपाच मुले असायची. कमी जागेत मोठा परिवार! कोकण, मिल कामगार आणि मोठे कुटुंब असे त्रिविध वैशिष्ट्ये असणारी ही सगळी मंडळी खऱ्या अर्थाने कष्टकरी! तसेच आर्थिक सुबत्ता नसणारी! तरीही एकमेकांबद्दल आपुलकी होती, प्रेमाची भावना होती.

आजही ती तारीख आठवतेय; त्यावेळचा प्रसंग डोळ्यासमोर चलचित्राप्रमाणे सुरु होतो. 

८ जुलै १९७२ हा दिवस आमच्यासाठी काळा दिवस! कारण ह्याच दिवशी आम्ही राहत असलेली `शिंदेवाडी इमारत क्र. १' (दादर मेन रोड हे जुने नाव आणि दादासाहेब फाळके रोड नवीन नाव.)  पहाटे कोसळली होती. त्या घटनेला ४९ वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणूनच हा लिखाण प्रपंच! 

आमच्या ह्या इमारतीत सुमारे २५० कुटुंबे होती. इमारतीचे वय नव्वद शंभर वर्षाचे असेल. तशी ती इमारत जीर्ण झाली होती म्हणून ठेकेदाराने काम सुरु केले. चौथ्या मजल्यावरून पाणी झिरपत ते खालच्या मजल्यावर येत असल्याने त्या ठेकेदाराने इमारतीला टेकू देऊन प्रथम गच्चीवरचे काम करण्यास सुरुवात केली. पावसाळ्यापूर्वी वरील काम झाले की इमारतीमधील काम नंतर करता येईल; ह्या उद्देशाने त्याने चौथ्या मजल्यावर सिमेंट काँक्रीटीकरण सुरु केले असावे; परंतु `आधी कळस मग पाया' असा प्रकार झाल्याने सगळा भार पेलणे इमारतीला शक्य नव्हते आणि इमारत पडण्याची चिन्हे दिसू लागली. शुक्रवार ७ जुलै रोजी मोठ्या प्रमाणात रात्री दहाच्या सुमारास भिंतीला तडे जाऊ लागले, भिंतीचे प्लॅस्टर भिंतीपासून वेगळे होऊ लागले, सिलिंगचे प्लॅस्टर धडाधड कोसळू लागले. इमारतीचा बाथरूमचा आणि मैदानाकडचा भाग खचू लागल्याचे दिसू लागले. ह्या सगळ्या भौतिक क्रिया होताना मात्र मनात ज्या भावनांचा कल्लोळ सुरु होता, त्याला रोखणे अधिक कठीण होते. 

इमारतीतील सगळेचजण घाबरले होते, भांबावले होते. कोणालाच काय करावे? हे सुचत नव्हते. इमारतीतील युवकांनी तत्कालीन स्थानिक नेते माननिय मोहन नाईक यांना कल्पना दिली. त्यांच्या समवेत इमारतीची-परिसराची पाहणी करण्यात आली. तोपर्यंत सर्वांना कल्पना आलीच होती की, आता इमारत सोडून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अचानक वर्षानुवर्षे राहत असलेली इमारत सोडणे- निवासी जागा सोडणे; ह्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. त्यातच जाणत्या लोकांनी पुढाकार घेतला होता आणि त्वरित इमारत खाली करण्याचे आवाहन केले. त्याचवेळेला अग्निशमन दलाला- पोलिसांना कळविण्यात आले होते. वेळ जसजशी पुढे जात होती तसतसा भावनांचा उद्रेक वाढत होता. मात्र इमारतीमधील वर्षानुवर्षांचा कौटुंबिक जिव्हाळा जपला जात होता. स्वतःच्या कुटुंबियांसमवेत प्रत्येकजण दुसऱ्याची काळजी घेत होता. इमारत कोसळणार होती हे पक्के होते; पण दुसऱ्या बाजूला माणुसकीचा पाया मजबूत होत होता. 

अग्निशमन दलाच्या प्रमुखांनी आणि पोलिसांनी रहिवाशांना जाहीररीत्या आवाहन केले की, आता इमारत खाली करा. उद्या सकाळी म्हाडाचे, महानगरपालिकेचे  अधिकारी, अभियंते प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी येतील आणि तुम्हाला इमारतीमध्ये पाठविण्यात येईल.'' पुरुष, महिला, तरुण, तरुणी, वृद्ध, बालक सर्वजण बाहेर पडले होते. त्यांच्याकडे फक्त अंगावरच्या कपडे होते. बाकी काही नाही. परिस्थिती अतिशय बिकट होती. तोपर्यंत रात्रीचे बारा वाजले होते. स्थानिक आमदार विलास सावंत, मोहन नाईक यांनी पुढाकार घेऊन महानगरपालिकेची शाळा उघडून दिली. `बुडत्याला काठीचा आधार' ह्या म्हणीनुसार त्या रात्री शाळेचा आधार मिळाला खरा पण उद्या काय? ह्या प्रश्नाने मात्र सगळेचजण गळून पडले होते. चेहऱ्यावर नाराजी होती-चीड होती, घसा कोरडा पडला होता, हात-पाय थरथरत होते, न रडताही डोळ्यांमधून गंगा यमुना वाहत होत्या. छाती धडधडत होती आणि तो आवाज स्पष्टपणे जाणवत होता. नियतीने झोप उडवलेलीच होती; झोप लागण्याचा प्रश्नच नव्हता! एकमेकांशी बोलून प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करायच्या होत्या; पण प्रत्ययेकजण आवंढा गिळून गप्प बसला होता.  

तेवढ्यात पाच साडेपाच वाजले होते. इमारतीचा थोडा थोडा भाग कोसळू लागला होता. अचानक खूप मोठा आवाज झाला. पहाटेच्या काळोखात धुळाचे लोट पसरला. झालं... संपलं.... मैदानाकडील इमारतीचा मधला भाग पूर्णतः जमीनदोस्त झाला होता. अनेक वर्षांचा संसार मातीमोल झाला होता. प्रत्येकजण फक्त फक्त आक्रोश करीत होता. कोणाला चक्कर आली, कोण बेशुद्ध पडले, कोणी स्तब्ध झाले. कोणी कोणाचे सांत्वन करावे? कोणी कोणाला धीर द्यावा? तरीही जीवित हानी झाली नाही; हा एक खूप मोठा जमेचा भाग होता. 

ह्या जमेच्या बाजूवर आजही जेव्हा मी विचार करतो तेव्हा मात्र एक गोष्ट इथे निश्चितपणे नमूद करावीच लागेल. 

आमच्या इमारतीसमोर गोल्डमोहर मिल आहे. तिथे मारूतीचे जागृत मंदिर सदर मिलच्या स्थापनेपासून आहे. आम्ही सर्व रहिवाशी इमारतीमध्ये प्रवेश करताना प्रथम मारुतीला नमस्कार करायचो. ही आमची श्रद्धा होती, आमचा विश्वास होता आणि मारुतीरायाचा आशीर्वाद होता; त्यामुळेच जीवित हानीचे दुःख त्यावेळी आले नाही. म्हणूनच `देव तारी त्याला कोण मारी?' असं शीर्षक लिहिलं आहे.  


अंगावरच्या वस्त्राशिवाय कोणतीही वस्तू नसताना जेवायचं कुठे आणि कसं? मात्र समोरच्या गुरुद्वारामध्ये तिथल्या व्यवस्थापनाने सर्वांना जेऊ घातले. अशा कठीण प्रसंगी अनेक सामाजिक संस्थांनी, राजकीय पक्षांनी सर्वतोपरी सहकार्य केले. 

अपघात होण्यापूर्वी पशु पक्षांना समजतात आणि ते तसे संकेत देतात; हे आपणासर्वांना माहिती आहेच. त्यावेळीसुद्धा अशीच एक घटना घडली. वृद्ध असणारी दळवी मावशी एकटी इमारतीत राहायची. तिला मुलबाळ नव्हतं. इमारतीच्या खाली फुटपाथवर केळी, शेंगा विकून ती आपला उदरनिर्वाह करीत असे. तिच्याकडे एक पाळलेला पोपट होता. त्या पोपटावर ती पुत्रवत प्रेम करायची! त्याचा सांभाळ करायची. तो पोपट ती घरी आली की तिच्याशी नेहमी बोलायचा. इमारत पडण्याच्या चार दिवस आधीपासून तो मावशीला सांगायचा, ``इथून बाहेर जाऊयात - इथून बाहेर जाऊयात!'' पण मावशीला त्याचा अर्थ समजला नाही. शेवटी इमारत कोसळली आणि तो पोपट पिंजऱ्यासह ढिगाऱ्याखाली गाढला गेला. ढिगारा उपसताना तिसऱ्या दिवशी तो पोपट पिंजऱ्यासह जिवंत सापडला. तोपर्यंत दळवी मावशी ढिगाऱ्याकडे एकटक लावून तीन दिवस तहान भूक विसरून डोळे पुसत पुसत बसली होती. तिला तिच्या संसारापेक्षा पुत्रवत असणारा पोपट हवा होता, तिला त्याचा खूप मोठा आधार वाटत होता!  त्यावेळी इमारतीच्या बातमी सोबत दळवी मावशी हीचा फोटो पोपट पिंजरा​सह वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला होता.

हा आधारच मनुष्याला घडवितो; मनुष्याचे भविष्य सुरक्षित करतो. मुलांचे आईबाप आधार असतात; नंतर आईबापांचे आधार मुलं होतात. ह्या भौतिक आधाराबरोबर त्या मारुतीरायाचा आधार म्हणजेच आध्यात्मिक आधार खूप महत्वाचा असतो आणि त्या आधारावरच आलेल्या सर्व प्रसंगावर मात करून आमची इमारत आजही दिमाखात उभी आहे आणि आम्ही सुद्धा आमच्या जीवनात यशस्वी झालो आहोत. १९७६ साली नवीन इमारतीमध्ये आम्ही पुन्हा राहायला गेलो; पण ४९ वर्षांपूर्वीची ती रात्र आजही आठवली की घाम फुटतो.  

आता नवीन पिढी आली. त्या वेदना ज्यांनी सोसल्या, त्यांचा त्याग आपल्याला विसरून चालणार नाही. तो प्रसंग पाहणारे काहीजण स्वर्गवासी झाले असतील; परंतु आजही आमच्यासारखी मंडळी आहे, ज्यांनी ह्या यातना सहन केल्या आहेत. त्यांनी आपले अनुभव पुढच्या पिढीसाठी सांगितले पाहिजेत. म्हणूनच मी माझा अनुभव सर्वांना शेअर करीत आहे. त्यावर आपल्या साधकबाधक प्रतिक्रियांच्या मी प्रतिक्षेत आहे. आपल्या प्रतिक्रिया लिहून पाठवा, व्हिडीओ बनवून पाठवा, माझ्याशी संवाद साधा! 

अजून काही आठवलं तर पुन्हा ह्यासंदर्भात लिखाण करण्याचा मानस आहे. त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. 

आपला सर्वांचा 

- मोहन सावंत

शिवनेरी सेवा मंडळलाचे क्रीडा प्रमुख लुमजी सुमंत धुरी उर्फ बाळ धुरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

लुमजी सुमंत धुरी उर्फ बाळ धुरी! क्रिडा क्षेत्रातील आदर्शवत व्यक्तिमत्व! त्यांनी व त्यांच्या सौभाग्यवती खोखो व अथ़ल्लेटिक्स-धावणे या भारतीय ख...